अंबरनाथ
अंबरनाथ हे ठाणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे.
पर्यटन
[संपादन]ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे शिलाहार राजांनी अकराव्या शतकात बांधलेले पुरातन हेमाडपंथी शैलीचे शिवमंदिर आहे. या मंदिरातील शिवलिंग स्वयंभू आहे. हे मंदिर जमिनीच्या पातळीवर बांधलेले आहे. या शिवमंदिर परिसरात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कल्पनेतून शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हल हा अतिशय मोठा कलामंच उभा करण्यात आला आहे. अंबरनाथ येथे आगपेट्यांचा तसेच दारूगोळ्याचा कारखाना आणि अनेक रासायनिक उद्योगही आहेत.
शिवमंदिर
[संपादन]मुंबईनगरीचे एक उपनगर अंबरनाथ. अंबरनाथ हे नाव बहुतेक अमरनाथ म्हणजेच शिवशंकर यावरून पडले असावे. हळेबीड-बेलूरची आठवण व्हावी असे एक महादेवाचं मंदिर इथे आहे. मंदिराचे प्रवेशद्वाराजवळ एक शिलालेख आढळतो. रॉयल एशियाटीक सोसायटीच्या एका खंडात हा इ.स. १०६०चा शिलालेख छापला आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी दोन नंदी आहेत. एका नंदीच्या गळयात शिवलिंग आहे. आत शिरल्यावर अठरा खांबांचा भव्य सभामंडप दिसतो त्यातले चारच खांब आता दिसतात ज्यावर सुरेख नक्षीकाम दिसते. बाकीचे खांब मात्र भिंतीत बुजले आहेत. मंडपाचे छत व कळस यामध्ये पोकळी आहे. कोनात जोडून असलेल्या गाभाऱ्यामुळे ऊनसावल्यांचा वेधक दृष्य पहायला मिळते. संपूर्ण मंदिर सव्वादोनशे कोरीव हत्तींच्या पाठीवर बांधलेले आहे. मंदिराच्या बाह्यांगाला चारी बाजूला विविध शिल्पे आहेत. त्यात त्रिशूल घेतलेली शिवमूर्ती, लक्ष्मीची मूर्ती, शिवलिंग, पार्वती, नरमुंडधारी महाकाली, शिवपार्वती विवाह, हंसारुढ ब्रम्हदेव, वराहरुढ विष्णू, ऊजव्या सोंडेचा गणपती, नृत्यांचे आविष्कार, शृगांरिक कामशिल्पे आढळतात. काळाच्या ओघात त्यात बरीच पडझड झालेली आहे. सभामंडपातील कोरलेले खांब म्हणजे कोरीवकामाचा उत्कृष्ट नमुनाच होय. सभामंडपाच्या मध्यभागावरील झुंबर त्याच्या भोवतालची वर्तुळे, घुमट, त्यावरचे नक्षीकाम फारच सुरेख आहे. गाभारा दिवसाउजेडी पाहिला तर आतील भागात योगी शिव कोरलेला दिसतो. सभामंडपापासून दहाबारा पायऱ्या उतरल्यावर गाभारा दिसतो. त्यात एक स्वयंभू काळया पाषाणाचे शिवलिंग व दुसरे घडीव गारगोटीचे शिवलिंग आहे. आंबा, चिंच यांची दाट राई इथे एकेकाळी असावी असं वाटतं. वढवाण नदीच्या ऐन काठावर हे मंदिर सहज लक्षात येत नसलं तरी प्रेक्षणीय नक्कीच आहे.